स्वगृह

‘‘मी सुरुंगांवरून चालून पाहिले
ज्वालामुखीवर मी फुलून पाहिले
मी पुनःपुन्हा जहर खाऊन पाहिले
मला नाकारणारे जगणे मी जगून पाहिले

मी जळत्या सूर्याला उराशी कवटाळून पाहिले
मी सुखांना खूपदा दुखवून पाहिले
खूप जखमांनी घरटी बांधली माझ्यावर
खूपदा मी जगण्याशिवाय जगून पाहिले’’
(खूपदा: जीवनायन)

ही कविता म्हणजे यशवंत मनोहर यांच्या संपूर्ण साहित्याचा आणि जीवनाचा ज्वलंत पासवर्डच आहे. हा परिघाबाहेरच्या अन्यायात जळत्या जगाचा ‘मी’ आहे. “यशवंत  मनोहर म्हणजे एक गूढरम्य सर्जनषीलता आहे. निर्मितीक्षमतेच्या त्याच्या रास्त अधिकारात एक चमत्कार आहे; अविष्वसनीय वाटावे असे ते वाङ्मयीन अद्भुत आहे… येरला या गावाच्या मातीतच असे काही गुण असावेत की जेणेकरून तिने आपल्या कुशीतून एका युगसाक्षी प्रतिभावंताला जन्म दिला. एखाद्या अद्ययावत प्रयोगशाळेत येरल्याच्या मातीचे परीक्षण केले पाहिजे.” असे ख्यातनाम समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी म्हटले, त्या नागपूर जिल्ह्यातील येरला या छोट्याशा खेड्यात यशवंत मनोहरांचा जन्म मोलमजुरी करून जमेल तसे पोटाच्या आगीला समजावणाऱ्या गरीब आईवडिलांच्या पोटी 26 मार्च 1943 रोजी झाला.

आर्थिक आणि सामाजिक विषमतेने त्यांना लहानपणापासूनच जाळले. शाळेत शिकताना त्यांना सुटीच्या दिवशी निंदणासारखी मजुरीची कामे करावी लागली. पण कळायला लागले तेव्हा या विषमतांचे दुष्ट व्यूह त्यांच्या लक्षात आले. तोवर मुकाटपणे पेटणारे त्यांचे अस्तित्व त्या यंत्रणांच्या विरोधात आक्रंदन करू लागले.

‘‘मी माझ्या सर्वनाशाची माझी कविता
अशी मशालीसारखी हातात घेऊन
पेटवून देईन हा अमानुष चक्रव्यूह’’
(उत्थानगुंफा)

अशा कडाडत्या शब्दात येथील विषमतेच्या रखवालदारांना त्यांनी ठणकावले. हातात विद्रोहाच्या धगधगत्या मशाली घेऊन 1960 नंतर त्यांनी मराठी साहित्यात प्रवेश केला.

गरिबीच्या आणि जातियतेच्या चटक्यांनी यशवंत मनोहर रडत बसले नाहीत. ते पेटून उठले. ते खेड्यातील अंधारात वाहून गेले नाहीत. त्यांनी अमानुषतेशी संघर्ष केला. हजारो वर्षांच्या विषमतेवर, तिच्या तत्त्वज्ञानावर आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या साहित्य, रूढी-परंपरा अशा सर्व छावण्यांवर त्यांनी निषेधाची आग ओतली.

पुढे वाचा..

  • महाराष्ट्र शासनाचा ‘कवी केशवसुत’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार, इचलकरंजीचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार हे मौलिक पुरस्कार मिळाले. या कवितासंग्रहात कवीच्या मनातली विलक्षण तडफड साकार होते. कविता विसाव्या शतकाची ही प्रदीर्घ कविता या कवितासंग्रहात आहे.

  • नवकवितेनंतरची मराठीतील अनन्य महत्त्वाची कविता. ज्वलंत विद्रोह आणि प्रज्ञान यांचे एक आगळेवेगळे प्रशांत रूप. इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार मुंबई अशा अत्यंत महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेला हा कविता- संग्रह आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट [...]

  • उत्थानगुंफा हा मनोहरांचा पहिला कवितासंग्रह. पु. ल. देशपांडे, बाबुराव बागूल, नरहर कुरुंदकर, म. सु. पाटील, संभाजी कदम, प्रा. रा. ग. जाधव, भालचंद्र फडके, बाळकृष्ण कवठेकर, भा. ल. भोळे अशा अनेक नामवंतांनी उत्थानगुंफेवर लिहिलेले समीक्षालेख या पुस्तकात आहेत. डॉ. अरुणा देशमुखांनी संपादित केलेले हे पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. [...]

  • या पुस्तकात प्रमोद वाळके यांनी यशवंत मनोहरांच्या काही पुस्तकांच्या, काही भाषणांच्या आणि काही लेखांच्या अनुषंगाने मुक्तचिंतन केलेले आहे आणि मनोहरांच्या साहित्यातील बुद्धिवादी सौंदर्याचा उत्कट वेध घेतलेला आहे.